
नमस्कार कवितेच्या रसिकांनो. आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण माझे आवडते कवी श्री. मंदार चोळकर यांनी मला मुलाखत दिली. त्यांची मुलाखत आज तुमच्या समोर सादर करतोय.
तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?
या प्रश्नावर ते म्हणाले की मी साधारण २००४ पासून कविता करायला लागलो. मुळात मी कविता केल्या नाहीत. सुरुवात मी चारोळ्यांपासून केली. ग.दि.मा. यांच्यावर आधारीत ' नक्षत्रांचे देणे ' हा ( अल्फा )झी मराठीवरील रंगमंचीय आविष्कार आणि एकूणच ग.दि.मांचं शब्दसामर्थ्य पाहून मी प्रभावीत झालो. आपणही काही तरी लिहावं असं वाटू लागलं. मोठ्या कविता करण्या इतपत अक्कल आणि शब्द भांडार तेव्हा नसावं कदाचित माझ्याजवळ, म्हणून मी चारोळ्या करायला सुरुवात केली. आणि कमी शब्दात आपल्या विचारांच प्रतिबिंब मांडता मांडता हळू हळू माझं शब्दविश्व समृद्ध करत गेलो.
पुढे साधारण २००६ च्या आसपास एक वेळ अशी आली की मला काही सुचेना ! मग मी माझ्याच चार ओळीच्या पुढे काही लिहीता येत का पाहिल, त्यानुसार एक दोन प्रयत्न यशस्वी झाले, पण एकदोनच, कारण प्रत्येक चारोळीची कविता होत नसते. हळुह्ळू मी स्वतंत्र कविता करायला सुरुवात केली. त्यामुळे.... इथुनच (२००७) माझा 'कवितांचा प्रवास' सुरु झाला असं म्हणता येईल.
तुमच्या कवितांबद्दल सांगा:
कवीला आपल्या कवितेबद्दल काय वाटते ते ऐकणे खूप महत्वाचे. मला मंदार त्यांच्या कवितेबद्दल काय म्हणतात याची खूप उत्सूकता होती. त्यांच्या कवितांबद्दल एक विषेश गोष्ट त्यांनी सांगितली त्याने तर मी आश्चर्यचकित झालो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते एक शब्द एकदाच वापरतात. मला पण मग त्यांच्या कविता वाचून ते शब्द सामर्थ्यात किती प्रवीण आहेत हे समजले.
त्यांच्याच कवितांबद्दल ते ,म्हणतात की माझ्या कवितांबद्द्ल सांगायचं झालं तर मी आशयघन कवित लिहीतो (concept oriented), खरं तर सगळेच तसं लिहीत असतील पण माझ्या कविता वाचताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवेल.
मी एका कवितेत एकदा वापरलेला शब्द पुन्हा वापरत नाही. माझी सुरुवात चारोळ्यांपासून झाली....म्हणूनही असेल कदाचित. मी जवळपास १०० च्यावर कविता केल्या आहेत
त्यापैकी दोन तीन कविताच या तत्वाला अपवाद आहेत. गझल हा प्रकार सोडला तर इतर सर्व कविता प्रकार मी हाताळलेले आहेत, आणि जे मी लिहीलय त्यात मी समाधानी आहे. मला माझ्या शब्दांचा माज आहे. आणि प्रत्येक कलाकाराला तो आपल्या कलाकृती बद्दल असावा ( स्वभावात नव्हे ) या मताचा मी आहे. पण मीच एकमेव महान आहे...किंवा मी सर्वोत्तम लिहीलय असं नाही...
एक रचना पूर्ण झाली की काही क्षणातच त्यातली नवलाई आणि 'आपण फार काही छान लिहिलं आहे' हा आनंद माझ्यापुरता संपुन जातो. मी विचार करतो त्या पेक्षाही सुंदर काही आणि कधी लिहीता येईल याचा. माझं माझ्या शब्दांवर स्वतःच्या श्वासांइतकच प्रेम आहे. बाकी माझ्या कवितेबद्द्ल मी बोलण्यापेक्षा इतरांनी बोललेलं जस्त चांगलं, .... नाही का ?
तुमचे आवडते कवी कोण?
आवडते कवी सांगताना ते म्हणाले की त्यांना ग.दि.मा., स्वातंत्र्यवीर सावरकर, शांताबाई शेळके, कुसुमाग्रज हे विषेश आवडतात. आजकालचा पिढीचा विचार करता त्यांना आवड अशी नाही... पण त्यातल्या त्यात संदिप च्या काही कविता त्यांना भावतात.
ते म्हणाले की वाचून कदाचित हसु येईल...पण मी स्वतः माझ्या स्वतःचा प्रचंड मोठा फॅन आहे. स्पष्टच सांगायचं झालं तर गीतकार आणि कवी या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. उत्तम (प्रसिद्ध) गीतकार हा चांगला कवी असेलच असं नाही. सकस शब्द लिहीणारी कुठलीही व्यक्ती त्या त्या कलाकृती संदर्भात मला आवडते...
शेवटी ते म्हणाले की अगदीच to the point बोलायचं झालं तर... ज्ञानेश्वर, ग.दि.मा., ग्रेस... यांना पर्याय नाही
तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?
कवितांवर असणा~या प्रभावाबद्दल ते म्हणाले की माझ्या कवितांवर कुणाचाच प्रभाव नाही. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे त्यांचे वाचन कमी आहे म्हणून कदाचित त्यांच्या कविता या वाचणा~याला आपल्या वाटत असल्या तरीही त्यावर कुठल्याही लिहिणा~याची छाप नाही.
त्यांच्या बद्दल माहिती:
यांचे पूर्ण नाव मंदार शशिकांत चोळकर. राहणे दादर. मुंबई.
ते व्यवसायाने ग्राफिक डिझाईनर आहेत. एका एडव्हरटाईझींग स्टुडियो मध्ये सिनीयर व्हिजुअलाईझर म्हणून काम करतात. स्वतःबद्दल बोलताना ते म्हणाले कविता करणं हा माझा छंद. माझ्याप्रमाणेच काव्यवेड्या मित्रमंडळीं सोबत स्वरचित कवितांचे जाहिर कार्यक्रम करतो. (http://www.thecreativebytes.com)
- त्यांचा 'शब्दात माझ्या' हा चारोळी संग्रह जेष्ठ कवी श्री. गंगाधर महांबरे यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे ( नोव्हेंबर २००७)
- डॉ. राहूल देशपांडे पुणे यांच्या प्रयत्नांनी साकार झालेल्या 'शरपंजरी आज मी' (महाभारत व्यक्तीरेखांवर आधारित) या ई-परिचयातून एकत्र आलेल्या कविंच्या पहिल्या वहिल्या काव्य-श्रुंखलेत त्यांचा 'एकलव्य' या लयगद्याचा समावेश करण्यात आला आहे. महांबरे काकांच्या हस्तेच बरोब्बर एक वर्षाने म्हणजेच नोव्हेंबर २००८ मधे याच काव्य श्रुंखलेचा ब्रेल अनुवाद प्रकाशित झाला. ते म्हणतात मझे शब्द आज अक्षरांच्या पलिकडे गेले आहेत याचा मला आनंद आणि अभिमान आहे.
- ऑडवाटेच्या कविता या ऑर्कुट वरील काव्यांजली समुहाच्या कविता संग्रहात त्यांची 'पाथरवट' कविता प्रकाशीत झाली आहे.
- पुण्याला जून २००८ मध्ये झालेल्या ' बरस रे मना ' या कार्यक्रमात त्यांच्या एका कवितेचं (ईशस्तवन) गीतात रुपांतर करुन त्यावर शास्त्रीय न्रुत्य सादर केलं गेलं.
- जुलै २००८ मध्ये 'मी मराठी' वरुन सादर झालेल्या ' जोडी नं. वन' या कथाबाह्य मालिकेचं शिर्षक गीत त्यांनी लिहीलं आहे.
- नाशिकला ऑगस्ट २००८ मध्ये झालेल्या ' बरस रे मना ' या कार्यक्रमात त्यांनी त्यांची एक कविता गीत रुपात सादर केली. त्याला संगीत पण दिले.
- सध्या दोन चित्रपटांसाठी आणि दोन अल्बम साठी , दोन मालिकांसाठी त्यांचे गीत लेखन चालू आहे.
स्वतः बद्दल सांगताना ते पुढे म्हणाले की मी गीतकार होण्याचा प्रयत्न करतो आहे. बघुया...काय होतय ते... काही गुणी संगीतकारांनी आणि गायकानी माझ्या शब्दांचं सोनं केलय. आणखिन गुणी संगीतकारांच्या शोधात आहे.
एवढच....आणखिन माझ्या बद्दल सांगण्यासारखं... माझ्या कडे काही नाही.
माझ्या सगळ्याच कविता मला खूप आवडतात.
काही पुस्तकात छान वाटतात
काही सादरी करणात...
काही गीत म्हणून तर ....
काही विचार म्हणून.
सहज म्हणून ही कविता देत आहे.
---- चैतन्याचे नूर द्या ----
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
खंगलेल्या आत्म्यांना चैतन्याचे नूर द्या
देऊन वाळवंटांना दिशा....
सुजलाम् सुफलाम् पूर द्या !
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
उन्मत्त वादळाला संयमाचा वेग द्या
थांग द्या सागरा अन् आभाळाला रंग द्या
देऊन मोती शिंपल्यांना....
माती ला या मेघ द्या !
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
काळरात्री किर्र रानी द्या तमाला काजवा ,
मल्हार द्यावा बरसता अन् ओसरताना मारवा
रक्त, नाती, भाव, प्रिती....
जोडणारा दूवा द्या !
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
द्या मनाला शंतता, अन् माणूसकीला आर्त द्या
वास्तवाला श्वास द्या अन् स्वप्नास वेड्या अर्थ द्या,
नीर्णयाला पूर्तता अन्....
जींकण्याला शर्थ द्या !!
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या
शब्दशहा (मंदार चोळकर)
मंदार चोळकर यांच्या आणिक कवितांसाठी इथे भेट द्या.
ते म्हणाले की त्यांना टोपणनाव नाही. मंदार याच नावाने लिहीतो. पण orkut related काव्यजगतात 'शब्दशहा ' म्हणून ही ओळखलो जातो ( अर्थात हे title माझं स्वतः मला दिलेलं आहे ). पण लवकरच शब्दशः - शब्दशहा या नावाने रंगमंचीय आविष्कार करण्याचा विचार आहे.
तर अश्या या शब्दशहा ने ही मुलाखत दिली म्हणून मी त्यांचा सदैव ऋणी असेन.
आपलाच
अनुराग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.