.
जाणारा तर निघून जातो.
कशाला ही उत्सुकता मग
पाठी उरणारांना, मृताच्या दर्शनाची?
दिसते का त्यांना
भवितव्यता त्या मृतदेहात
स्वतःच्याच नश्वर देहाची?
पाखरू पिंजर्यात गाताना
कुणीही त्या गीताची लकेर ऐकत नाही
सूर्य नभी तळपताना
कुणाला त्याच्या अस्तित्वाची किंमत समजत नाही
उपेक्षित अपमानित
उडतं मग पाखरू, चोच मिटून कायमची!
विझतो तो सूर्य, मिटून घेऊन स्वतःत
तेजप्रभा प्राणांची!
बाह्यात्कारी मात्र,
जगाला दिसतो अपघात--
गाडीसमोर घडलेला!
न्याहाळतं जग उत्सुकतेने
रिकाम्या देहाचा, निर्जीव पिंजऱ्याचा,
तुकडा तुकडा विखुरलेला!
खरंच त्या बघ्यांना
दिसते का त्या मृतदेहात
भवितव्यता स्वतःची?
तरीही का मग करतात पूजा
पाखरू नाकारून पिंजऱ्याची,
सूर्यास डावलून आभाळाची;
आणि आत्मा नाकारून देहाची??
प्रभा प्रभुदेसाई
३०.४.१९७५.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.