शनिवार, १४ मार्च, २००९

माझ्या मातीचे डोहाळे - हरीश दांगट

.

माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश
भर दुपारीस झाला , तिन्ही सांजेचा प्रकाश 

वादळाचा झाला जोर, झेली धरणी प्रहार 
उणे फेडायाच्या साठी, झाडे घेती कैवार
विज कडाडून उजळी , अवघे अवकाश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश

रानवारा झाला धुंद, सुटे केतकीचा गंध
झेंडू पडला आडवा, चुर झाला निशीगंध
सार्‍या लिंबोळ्या गळून , लिंब झालासे निराश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश

विज कडाडे आभाळी, जुने छत अश्रु ढाळी
पिंपळाच्या पारावर, आली तुटून डहाळी
वड हालेना जागचा, पारंब्यांचा बाहूपाश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश

आला मातीला पाघळ, तिचे वाहती ओघळ
नदी वाहते भरुन, ओढा करीतो खळाळ
रुजलेल्या बियान्यास, माती घाली मोहपाश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश


March 11, 2009

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.