गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

माहेर

.

ऐ अवखळ वारया ...‬
‪एक सांगते रे तुला ...‬
‪माझा निरोप घेवुन ....‬
‪जा न माझ्या माहेराला ...‬

‪त्या डोंगारापल्याड ....‬
‪माझ्या माहेराचे घर ...‬
‪पायवाट दिसे तुला ...‬
‪चाल हिच्या बरोबर ....‬

‪पायवाट सोडी तुला ....‬
‪माझ्या माहेरच्या घरी ....‬
‪स्वागताला तुझ्या असे ....‬
‪रांगोळी ही माझ्या दारी ...‬

‪अंगणात जाशी तेव्हा ....‬
‪दिसे विहीर पाण्याची....‬
‪अमृत जणू भासे ...‬
‪तृषा शमवी सारयांची ....‬

‪ते बघ ...तिथे माझी‬
‪माय दिसेल रे तुला ....‬
‪चारा घालित असेल ....‬
‪माझ्या लाडक्या गाईला .....‬

‪ती मूक गाय होती....‬
‪माझी सखी सोबतीण ...‬
‪आता कुणी नाही तिला ....‬
‪माझ्या माझ्या माई विण ...‬

‪तिचे लाडाचे वासरू ...‬
‪जणू माझे ही लेकरु....‬
‪म्हणायचे रे मी त्याला...‬
‪कधी लाडाने कोकरू ...‬

‪माझ्या बाबाचा आवाज...‬
‪येई देवाघरातुन ....‬
‪पोथी वाचता वाचता ....‬
‪टालांची ही किनकिन ...‬

‪तिथे माडीवर उभा ....‬
‪माझा पाठीराखा भाऊ....‬
‪त्याच्या विरहाचे अश्रु ....‬
‪आता कसे रे मी साहू ....‬

‪माडीमागे बघ दिसे...‬
‪तुला मोगरयाची बाग ...‬
‪तिथल्या मातीचा सुगंध ...‬
‪तू त्या मोगारयाला माग ....‬

‪आता ये रे पुन्हा इथे ...‬
‪तू ..तो सुगंध घेवुन ...‬
‪माझ्या माहेराचे लेणे ...‬
‪पुन्हा नव्याने लेवुन ...‬

‪माझ्या माहेराचे लेणे...‬
‪पुन्हा नव्याने लेवुन..‬

- मोहिनी


मोहिनी यांच्या अनेक कविता ईथे वाचा
मोहिनी यांचे ऑरकूट पान

.

रविवार, १९ जुलै, २००९

एक सुन्न कविता... आपल्या आईसाठी वाचा - धुंद रवी

....

प्रिय आईस,
तु मेलीस हे तु बरं केलंस....
गेल्या कित्येक वर्षातली आम्हाला तुझी पटलेली एकमेव गोष्ट...
आम्ही तुझ्या मरणाची वाट बघण्याआधिच तु मेलीस
...हे किती छान केलंस.

तसही तुझी मळलेली सुरकुतलेली कातडी
आमच्या दिवाणखानातल्या पडद्यांना म्याचिंग नव्हतीच.

तुझ्या कपड्यांच्या गाठोड्यापेक्षाहि छोटं
शरीरचं मुटकळं घेऊन
पडुन राहीलीही असतीस कोप-यात...
पण नाही बांधुन घेतली आडगळीची खोली,
.....उगाच तुला मोह नको....

जनाची आम्ही कधिच सोडली आणि मनाची ही न ठेवता
टाकलं ही असतं तुला अनाथ आश्रमात...
पण तिथंही पॆसे पडतात
आणि आणखिन एक ई.एम.आय. नकोय आम्हाला...
तु सोडवलंस आम्हाला...
तु मेलीस हे तु बरं केलंस....


आणखिन एक...
तु जन्म दिलास आम्हाला आणि वाढवलंस वॆगेरे...
हे असले काही ऎकवु नकोस...
हिशोब जड जातील तुला !
जनावरं पण आपल्या पिलाला जन्म देतातंच की....
पुनरुत्पादन ह निसर्गाचा नियमंच आहे.
त्यामुळे आमच्यावर उपकार केलेस ह्या भ्रमात राहु नकोस...

आम्ही पण सांभाळलच की तुला..
दोनदा दवाखान्यात पण नेलं होतं.... त्यातल्या एकदा तर हाफ़ डे टाकुन...


तसं तुझ्याकडुन कधी तक्रार ऎकली नाही कसलीच.
म्हणजे सुखातंच असणार तु...
पण तरीही तुला ब-याचदा एकट्यानेच रडताना पाहायलय मी...
पण काही सिरियस नसणार... काही कारणच नाही रडायला...

पण एक सांगु आई...
हल्ली मला पण असंच रडायला येतं...
आणि रडतो एकट्यानीच....
तुझी खुप आठवण येते आणि मग खुप भरून येतं...

तसं झालं काहीच नाहीये पण....

पण...
मुलगा मोठा झालाय माझा
आणि त्याला काही पटतंच नाही माझं....
दिवाणखान्यातले पडदे बदलायचं म्हणतोय....
हरकत नाही माझी....
पण....
पण... आपल्या घरात आडगळीची खोलीच नाहीये गं !

~ धुंद रवी

धुंद रवी यांचा ऑरकूट प्रोफाईल ईथे बघा

.

रविवार, २१ जून, २००९

म्हणून त्या कविता मी परत वाचत नाही…! - दीपक इंगळे

.

निजण्याआधी तुज्यावर कविता करायच्या
हे तर आता रोजचंच झालंय
आणि याची कितीही सवय झाली आहे असं म्हटलं
तरी प्रत्येक वेळेस लिहिताना मला भरून आलंय

मी कविता का लिहितो
हे मला खरंच कळत नाही
कारण जिच्यासाठी मी त्या लिहितो
तिच्यापर्यंत त्या कधीच पोहोचत नाही
आणि मनाची परत घालमेल नको
म्हणून मी ही त्या परत वाचत नाही

तुला खरं वाटणार नाही
पण माझ्या कवितेचा प्रत्येक शब्द माझं काळीज जाळतो
तू माझ्या शब्दाकडे नीट पाहिलंस
तर तुलाही कळेल की
माझा प्रत्येक शब्द मूक अश्रू ढाळतो

माझ्या या कविता
मला कधीही न सुटलेलं कोडं आहे
अफाट दुखः दाबलय मनात
कवितेतून बाहेर आलेलं हे फक्त थोडं आहे

आज वाटलं की अश्रूंच्या शाईनेच कविता लिहावी
तसेही डोळ्यातून ते आज काल आटता-आटत नाही
हे ऐकून अश्रूही आज बोलले
म्हणाले, मनात घुसमट होते म्हणून बाहेर येतो
तर आता तुला तेही पटत नाही

~ दीपक इंगळे

दीपक इंगळे यांचा ब्लाग इथे बघा


.

गुरुवार, ११ जून, २००९

मुलाखत: चैताली अहेर

नमस्कार मंडळी

बरेच दिवसांनंतर पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवी मुलाखत घेऊन सादर होतो आहे. चैताली अहेर या कवियत्री यांची खासियत अशी की त्यांना त्यांच्या प्रतिभेचा साक्षात्कार ऑरकूट वर कविता वाचता वाचता झाला. ऑरकूट चे आभार की त्याने चैताली ला लिहिण्यास प्रोत्साहित केले आणि आपल्याला एक प्रतिभासंप्पन्न कवियत्री मिळाली. चला मी त्यांची घेतलेली मुलाखत वाचुया.

तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?
मी कविता ओर्कुट जोइन केल्यापासूनच लिहायला लागले.... जेव्हा काही कविता लिहिल्या तेव्हा मला कळले की अरे हेच तर मी शोधत होते.....म्हणजे साधारण माझी पहिली कविता मी जुलै ०७ मध्ये लिहिली होती...पण त्याअगोदरपासूनच मी कविता जगत होते बहुधा...अभिव्यक्ती नंतर मिळाली शब्दांना..!!
कवी डॉ.राहूल देशपांडे ह्यांना मी माझे गुरू मानते,अरूण नंदन ह्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले...

तुमच्या कवितांबद्दल काही सांगा
माझ्या कविता ह्या अगदी आतून येतात...मी स्वत:साठी लिहिते...स्वत:शी संवाद करते ..मी कवितांमधून बऱ्याचदा हे जग चालवणाऱ्या शक्तीशी बोलत असते; ज्याला मी माझा "आभाळातला मित्र" म्हणते ...म्हणूनच मी गुढ लिहिते असे सगळे म्हणत असावेत.. तरीही मी वेगवेगळे विषयही हाताळते....

तुम्हाला कोणते कवी अधिक आवडतात?
मला इंदिरा संत ,विं.दा. करंदीकर अधिक भावतात,ग्रेस,सुधीर मोघे... त्याचबरोबर इतरही कवींच्या कविता आवडतात,तेव्हा कविता आवडणं हे महत्त्वाचं.. कवी नाही!!..मी गद्यही तेवढ्याच आत्मियतेने वाचते..

तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?
ते मलाही सांगता येणार नाही..कारण मी कविता आधी लिहायला लागले आणी नंतर कविता वाचन सुरु केले..कदाचित हे जरा वेगळॆ वाटेल ऐकताना पण सत्य हेच आहे...

तुमचे नाव, टोपण नाव, जन्म गाव आणि तुमच्या बद्दल जी माहिती देता येईल अशी माहिती द्या
माझे पुर्ण नाव चैताली दर्शन आहेर आहे.माझे जन्मगाव कोपरगाव जि.अहमदनगर[शिर्डीजवळ]आहे..मी शिक्षिका आहे...


तुम्हाला आवडणारी तुमची एक कविता.

अश्रांत कहाण्या....!!!
प्रत्येकवेळी असंच होतं......
नादभरल्या डोळ्यांनी काही सांगायला जावं.....
अन‌ तु शब्दांची किंतानं ओढून बसावं.....
मी उभं रहावं स्तब्ध झाडाप्रमाणं........
अन‌ तु मूळा-मूळांनी माझ्यात पसरावं....
मी फांद्या मागाव्या उसन्या...
तु नुसतं पानात हसावं...
मी श्वासांच्या कंपनतारांवर वाळत घालावं जगणं....
त्याचवेळी तूझं आयुष्याला बोलावणं....

असंच का होतं....सारखं-सारखं....
भिंगारला जीव श्रांत करून मी बसावं.....
अन‌ तु आणावी परत स्वप्नांची लव्हाळं.....
बोलले नाही ओठांनी शहाण्या...
समजून घे ना....
उपशमल्या जीवाच्या....
अश्रांत कहाण्या....!!!


------चैताली.

मंडळी चैताली अहेर यांच्या कविता वाचण्यासाठी तुम्ही त्यांच्या ब्लागवर इथे जाऊ शकता
चैताली अहेर यांचा ऑरकूट प्रोफाईल इथे बघू शकता




बेड नंबर ५ - भारती सरमळकर

.
.
.
संथ वेगाने सिलिंग फॅन फिरतोय
साईड टेबलावर फळ पडलेली
पाण्याने भरलेला तांब्या
टैबलेटस, इन्जेक्शन्स हि ओशाळलेली
एक कपाट
खिडक्यांना हिरवे पडदे
एक शुभ्र टूबलाईट, सलाईन स्टँन्ड...
बेडखाली युरीन आणि स्टूल पॉट
बेडच्या बाजूला दोन खुर्च्या
एक्सरे, सिटी स्कैन रिपोर्ट्स
आणि
.
.
.
बेडवर निपचित पहुडलेली
निर्विकार डोळ्यांनी ह्या सर्व वस्तू पाहणारी
आणखी एक निर्जीव वस्तू
नावाला जीव बाकी
मशीन वर चालणारी त्याची स्पंदने
शून्यात पाहणारी त्याची नज़र
आयुष्य गाठ काही सोडत नाही
आणि मरण काही येत नाही
"कोमा" तून बाहेर कधी येणार
कुणालाच माहित नाही
.
एक प्रश्न सारखा डोक्याला झिणझिण्या आणणारा
वस्तूनाहि ओळख असते का?
.
असते तर मग
त्याची ओळख फक्त एकच ............बेड नंबर - ५
.
.
.
........भारती सरमळकर (१०-०६-२००९)

यांचा अॉरकूट प्रोफाइल, यांच्या कविता इथे वाचा
.
.

शनिवार, २३ मे, २००९

सगळेजण - योगेश जोशी (पुणे)

.

प्रेम करताय तुम्ही?
मी सुध्दा…

शब्द वाकवले जेव्हा
तेव्हा सूर मोकळे झाले
डोळे उजळून पाहता वर
किरणांचे आभाळ झाले

गाणं गाताय तुम्ही?
मी सुध्दा…

रात्रीनं सांगितला अर्थ मला
तुटणाऱ्या ताऱ्यांचा
झाडामागून वाट काढताना
भरारणाऱ्या वाऱ्याचा

दिवे लावताय तुम्ही?
मी सुध्दा…

भरारत्या समुद्राचे कधी
तुफान गल्बतावर आले
हात धरलेल्या हातांनी मग
शीड काळजाचे केले

वाट शोधताय तुम्ही?
मी सुध्दा…

प्रेम करताय तुम्ही?
मी सुध्दा…

योगेश जोशी

सोमवार, २३ मार्च, २००९

कुठे म्हणालो परी असावी - प्रवासी

.

कुठे म्हणालो परी असावी
मनाप्रमाणेतरी असावी

हवा कशाला प्रचंड पैसा
जगायला नोकरी असावी

तरूस आधार होत जावी
अशी कुणी वल्लरी असावी

नको अवाढव्य राजवाडा
निजायला ओसरी असावी

नको दिखाव्यास गोड गप्पा
मनात प्रीती खरी असावी

- प्रणव सदाशिव काळे "प्रवासी"

.

शनिवार, २१ मार्च, २००९

मुलाखत: मंदार चोळकर

नमस्कार कवितेच्या रसिकांनो.  आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण माझे आवडते कवी श्री. मंदार चोळकर यांनी मला मुलाखत दिली.  त्यांची मुलाखत आज तुमच्या समोर सादर करतोय.

तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?

या प्रश्नावर ते म्हणाले की मी साधारण २००४ पासून कविता करायला लागलो. मुळात मी कविता केल्या नाहीत.  सुरुवात मी चारोळ्यांपासून केली. ग.दि.मा. यांच्यावर आधारीत ' नक्षत्रांचे देणे ' हा ( अल्फा )झी मराठीवरील रंगमंचीय आविष्कार आणि एकूणच ग.दि.मांचं शब्दसामर्थ्य पाहून मी प्रभावीत झालो. आपणही काही तरी लिहावं असं वाटू लागलं.  मोठ्या कविता करण्या इतपत अक्कल आणि शब्द भांडार तेव्हा नसावं कदाचित माझ्याजवळ, म्हणून मी चारोळ्या करायला सुरुवात केली. आणि कमी शब्दात आपल्या विचारांच प्रतिबिंब मांडता मांडता हळू हळू माझं शब्दविश्व समृद्ध करत गेलो.  

पुढे साधारण २००६ च्या आसपास एक वेळ अशी आली की मला काही सुचेना !  मग मी माझ्याच चार ओळीच्या पुढे काही लिहीता येत का पाहिल,  त्यानुसार एक दोन प्रयत्न यशस्वी झाले, पण एकदोनच, कारण प्रत्येक चारोळीची कविता होत नसते.  हळुह्ळू मी स्वतंत्र कविता करायला सुरुवात केली.  त्यामुळे.... इथुनच (२००७) माझा 'कवितांचा प्रवास' सुरु झाला असं म्हणता येईल.

तुमच्या कवितांबद्दल सांगा:

कवीला आपल्या कवितेबद्दल काय वाटते ते ऐकणे खूप महत्वाचे.  मला मंदार त्यांच्या कवितेबद्दल काय म्हणतात याची खूप उत्सूकता होती.  त्यांच्या कवितांबद्दल एक विषेश गोष्ट त्यांनी सांगितली त्याने तर मी आश्चर्यचकित झालो.  त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते एक शब्द एकदाच वापरतात.  मला पण मग त्यांच्या कविता वाचून ते शब्द सामर्थ्यात किती प्रवीण आहेत हे समजले.

त्यांच्याच कवितांबद्दल ते ,म्हणतात की  माझ्या कवितांबद्द्ल सांगायचं झालं तर मी आशयघन कवित लिहीतो (concept oriented), खरं तर सगळेच तसं लिहीत असतील पण माझ्या कविता वाचताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवेल.

मी एका कवितेत एकदा वापरलेला शब्द पुन्हा वापरत नाही.  माझी सुरुवात चारोळ्यांपासून झाली....म्हणूनही असेल कदाचित.  मी जवळपास १०० च्यावर कविता केल्या आहेत
त्यापैकी दोन तीन कविताच या तत्वाला अपवाद आहेत.  गझल हा प्रकार सोडला तर इतर सर्व कविता प्रकार मी हाताळलेले आहेत, आणि जे मी लिहीलय त्यात मी समाधानी आहे.  मला माझ्या शब्दांचा माज आहे.  आणि प्रत्येक कलाकाराला तो आपल्या कलाकृती बद्दल असावा ( स्वभावात नव्हे ) या मताचा मी आहे. पण मीच एकमेव महान आहे...किंवा मी सर्वोत्तम लिहीलय असं नाही...

एक रचना पूर्ण झाली की काही क्षणातच त्यातली नवलाई आणि 'आपण फार काही छान लिहिलं आहे' हा आनंद माझ्यापुरता संपुन जातो.   मी विचार करतो त्या पेक्षाही सुंदर काही आणि कधी लिहीता येईल याचा.  माझं माझ्या शब्दांवर स्वतःच्या श्वासांइतकच प्रेम आहे.  बाकी माझ्या कवितेबद्द्ल मी बोलण्यापेक्षा इतरांनी बोललेलं जस्त चांगलं, .... नाही का ?

तुमचे आवडते कवी कोण?

आवडते कवी सांगताना ते म्हणाले की त्यांना ग.दि.मा., स्वातंत्र्यवीर सावरकर, शांताबाई शेळके,  कुसुमाग्रज हे विषेश आवडतात.  आजकालचा पिढीचा विचार करता त्यांना आवड अशी नाही... पण त्यातल्या त्यात संदिप च्या काही कविता त्यांना भावतात.

ते म्हणाले की वाचून कदाचित हसु येईल...पण मी स्वतः माझ्या स्वतःचा प्रचंड मोठा फॅन आहे.  स्पष्टच सांगायचं झालं तर गीतकार आणि कवी या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.  उत्तम (प्रसिद्ध) गीतकार हा चांगला कवी असेलच असं नाही.  सकस शब्द लिहीणारी कुठलीही व्यक्ती त्या त्या कलाकृती संदर्भात मला आवडते...
 
शेवटी ते म्हणाले की अगदीच to the point बोलायचं झालं तर... ज्ञानेश्वर, ग.दि.मा., ग्रेस... यांना पर्याय नाही

तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?

कवितांवर असणा~या प्रभावाबद्दल ते म्हणाले की माझ्या कवितांवर कुणाचाच प्रभाव नाही.  त्यांच्या म्हणण्या प्रमाणे त्यांचे वाचन कमी आहे म्हणून कदाचित त्यांच्या कविता या वाचणा~याला आपल्या वाटत असल्या तरीही त्यावर कुठल्याही लिहिणा~याची छाप नाही.

त्यांच्या बद्दल माहिती:

यांचे पूर्ण नाव मंदार शशिकांत चोळकर. राहणे दादर. मुंबई.

ते व्यवसायाने ग्राफिक डिझाईनर आहेत.  एका एडव्हरटाईझींग स्टुडियो मध्ये सिनीयर व्हिजुअलाईझर म्हणून काम करतात.  स्वतःबद्दल बोलताना ते म्हणाले कविता करणं हा माझा छंद.  माझ्याप्रमाणेच काव्यवेड्या मित्रमंडळीं सोबत स्वरचित कवितांचे जाहिर कार्यक्रम करतो. (http://www.thecreativebytes.com)

  • त्यांचा 'शब्दात माझ्या' हा चारोळी संग्रह जेष्ठ कवी श्री. गंगाधर महांबरे यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे ( नोव्हेंबर २००७)

  • डॉ. राहूल देशपांडे पुणे यांच्या प्रयत्नांनी साकार झालेल्या 'शरपंजरी आज मी' (महाभारत व्यक्तीरेखांवर आधारित) या ई-परिचयातून एकत्र आलेल्या कविंच्या पहिल्या वहिल्या काव्य-श्रुंखलेत त्यांचा 'एकलव्य' या लयगद्याचा समावेश करण्यात आला आहे.  महांबरे काकांच्या हस्तेच बरोब्बर एक वर्षाने म्हणजेच नोव्हेंबर २००८ मधे याच काव्य श्रुंखलेचा ब्रेल अनुवाद प्रकाशित झाला.  ते म्हणतात मझे शब्द आज अक्षरांच्या पलिकडे गेले आहेत याचा मला आनंद आणि अभिमान आहे.

  • ऑडवाटेच्या कविता या ऑर्कुट वरील काव्यांजली समुहाच्या कविता संग्रहात त्यांची 'पाथरवट' कविता प्रकाशीत झाली आहे.

  • पुण्याला जून २००८ मध्ये झालेल्या ' बरस रे मना ' या कार्यक्रमात त्यांच्या एका कवितेचं (ईशस्तवन) गीतात रुपांतर करुन त्यावर शास्त्रीय न्रुत्य सादर केलं गेलं.

  • जुलै २००८ मध्ये 'मी मराठी' वरुन सादर झालेल्या ' जोडी नं. वन' या कथाबाह्य मालिकेचं शिर्षक गीत त्यांनी लिहीलं आहे.

  • नाशिकला ऑगस्ट २००८ मध्ये झालेल्या ' बरस रे मना ' या कार्यक्रमात त्यांनी त्यांची एक कविता गीत रुपात सादर केली. त्याला संगीत पण दिले. 

  • सध्या दोन चित्रपटांसाठी आणि दोन अल्बम साठी , दोन मालिकांसाठी त्यांचे गीत लेखन चालू आहे.
स्वतः बद्दल सांगताना ते पुढे म्हणाले की मी गीतकार होण्याचा प्रयत्न करतो आहे.  बघुया...काय होतय ते... काही गुणी संगीतकारांनी आणि गायकानी माझ्या शब्दांचं सोनं केलय.  आणखिन गुणी संगीतकारांच्या शोधात आहे.
एवढच....आणखिन माझ्या बद्दल सांगण्यासारखं... माझ्या कडे काही नाही.

माझ्या सगळ्याच कविता मला खूप आवडतात.
काही पुस्तकात छान वाटतात
काही सादरी करणात...
काही गीत म्हणून तर ....
काही विचार म्हणून.
 
 
सहज म्हणून ही कविता देत आहे.
 
---- चैतन्याचे नूर द्या ----

गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
खंगलेल्या आत्म्यांना चैतन्याचे नूर द्या
देऊन वाळवंटांना दिशा....
सुजलाम् सुफलाम् पूर द्या !
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
 
उन्मत्त वादळाला संयमाचा वेग द्या
थांग द्या सागरा अन् आभाळाला रंग द्या
देऊन मोती शिंपल्यांना....
माती ला या मेघ द्या !
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
 
काळरात्री किर्र रानी द्या तमाला काजवा ,
मल्हार द्यावा बरसता अन् ओसरताना मारवा
रक्त, नाती, भाव, प्रिती....
जोडणारा दूवा द्या !
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
 
द्या मनाला शंतता, अन् माणूसकीला आर्त द्या
वास्तवाला श्वास द्या अन् स्वप्नास वेड्या अर्थ द्या,
नीर्णयाला पूर्तता अन्....
जींकण्याला शर्थ द्या !!
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या

शब्दशहा (मंदार चोळकर)
 
मंदार चोळकर यांच्या आणिक कवितांसाठी इथे भेट द्या.

ते म्हणाले की त्यांना टोपणनाव नाही. मंदार याच नावाने लिहीतो.  पण orkut related काव्यजगतात 'शब्दशहा ' म्हणून ही ओळखलो जातो  ( अर्थात हे title माझं स्वतः मला दिलेलं आहे ).  पण लवकरच शब्दशः - शब्दशहा या नावाने रंगमंचीय आविष्कार करण्याचा विचार आहे.

तर अश्या या शब्दशहा ने ही मुलाखत दिली म्हणून मी त्यांचा सदैव ऋणी असेन.

आपलाच 
अनुराग

शुक्रवार, २० मार्च, २००९

अमिताभ - सॅम अंकल

.

मोठे लोक भेटतात तसा
मीही भेटलो अमिताभला
माझी ओळख करुन द्यायला
त्याने बोलावलं ऐश्वर्याला

डोक्यावर पदर जमिनीवर नजर
मला स्वप्नंच वाटलं
मनात म्हटलं विश्वसुंदरीचं
गोडं वरण झालं

तिने केलेले पोहे हाणत 
आमच्या गप्पा भारी रंगल्या
ऐकुन माझ्या कविता त्यांनी
जोरात टाळ्या पिटल्या

निघताना मात्र अमिताभ
थोडा भावुक झाला
डोळ्यामधलं पाणी लपवत
अमिताभ मला म्हणाला

यार माझ्यातला ऍंग्रीयंगमॅन
कुठेतरी हरवलाय 
दुनियादारी करता करता
कुठेतरी भरकटलाय

म्हटलं बाबा तुझं काय
सगळ्यांचच तसं झालंय
संस्कार वगैरे जपता जपता
पुरुषत्व गहाण पडलंय

तुझं जरा बरं आहे 
तु खोटा तरी पेटुन उठलास
खोटया खोटया देशद्रोह्यांशी
खोटा तरी लढलास

मध्यमवर्गीय कवी मी 
मी काय करणार
पडद्यावर तुला लढताना बघुन
अंधारात शिट्टी मारणार

नेता, गुंड येता दारी
मी नम्र हात जोडणार
भ्रष्टाचारी सत्तेसमोर
मी मुकाट शेपुट हलविणार

ऐकुन माझे विचार 
अमिताभ दाढी खाजवत हसला
सिनेमासाठे स्टोरी लिही
अमिताभ, खरंच मला बोलला


.

बुधवार, १८ मार्च, २००९

नियम - योगेश जोशी (पुणे)

.

बेभान मन एकच छंद
जगायचंय मला प्रत्येक सेकंद

आले क्षण अन जातील किती
पारा निसटण्याचीच मला भिती
तेज साठवेन डोळ्यात, होण्याआधी बंद
जगायचंय..जगायचंय मला प्रत्येक सेकंद

शतदा प्रेम करावे ची धून
चांद्णे, दवबिंदू, पायल रुणझुण
फुलांचा वास घ्यायला कसले आलेत निर्बंध
जगायचंय..जगायचंय मला प्रत्येक सेकंद

तेच ते जगणे अन कंटाळवाणे रुटीन
उपाय एकच हरक्षणाला नव्याने भेटीन
नजर बदलता माझी, आयुष्य़ बदलेल सबंध
जगायचंय..जगायचंय मला प्रत्येक सेकंद

- योगेश जोशी (पुणे)

.

सोमवार, १६ मार्च, २००९

त्या वाळक्या काठीसोबत - प्रमोद खाडिलकर

.

बाजारच्या रस्त्यावरून जाताना 
मी नेहमी माझ्या मित्राच्या दुकानात जायचो.
सारखा तराजूच्या पारड्यांवर मोजमाप करत असायचा.
सर्हाईतपणे विचारायचा--
"कुठं चालला आहेस?"
माझं उत्तर ठरलेलं-
"व्रुद्धाश्रमात"
पुन्हा ठरलेला प्रश्न:
"का वेळ घालवतोस वाया,
तिथं जाऊन?"
मी हसायचो.
शेजारच्या टपरीतून चहा मागवून
म्हणायचा,
"काय होतं तू तिथं जाऊन?"
"त्यांना बरं वाटतं इतकंच,
जाणवतं की त्यांच्या वेदना जाणणारं
आहे कु्णीतरी"
तो उशीला रेलत
आणखी एक घोट घेत म्हणायचा
"मग, त्यानं काय होतं?"
मग मी नुसता शांत व्हायचो.
मनातनं त्याच्या
असंवेदनशीलतेवर चिडायचो.
तो म्हणायचा,
"वेदना का जाणवतात, ठाऊक आहे?
संवेदनेमुळे--
वेदना संवेदनेची असते. अरे--
एकदम व्यावहारीक जगावं,
नफ्या-तोट्याचं गणित
सारखं मांडत रहावं!
तूच सांग, महत्त्वाचं गणित की संवेदना?
तुझं गणित पक्कं म्हणून तुला मिळाली
नोकरी, की संवेदना पक्की म्हणून?"
मी हसायचो.
"कुणीतरी द्यावी लागते संवेदना,
परत मिळण्यासाठी,
आणि
एकदा अंकुरली की
वाढत जाते आभाळभर
ज्ञानोबाच्या वेलीसारखी"
तो हसायचा नुसता.
पोरावर डाफरत,
"चाय मे पानी कम डालो"
सांगत पैसे काढून द्यायचा.
गल्ल्यातून.

***

परवा खूप दिवसांनी
गेलो त्याच्याकडे.
कधी नव्हे तो 
तराजूवर काही मोजत नव्हता.
काय करतो आहेस?
"स्पंदनं ऐकत बसलो आहे स्वतःची"
तो म्हणाला.
जवळ जाऊन बघितलं
तर भलं मोठं प्लॅस्टर पायाला
आणि शेजारी
एक मळकट काठी.
ओबड धोबड.
काय झालं रे?
काळजीनं म्हणालो तेव्हा,
"चालत्या लोकलमधून पडलो,
तरी बरं-
स्लो होती. नाही तर
राम नाम सत्य होतं"
मग?
"नंतर बराच वेळ पडलो होतो.
विव्हळत.
९:१०ची, ९:१५ची, ९:१८ ची
९:२०ची सगळ्या लोकल 
जात होत्या.
माणसांनी भरलेल्या.
पण
नाही आलं कुणी वळून
मदतीला."
कुणीच नाही??
"नाही. लेट मार्कचा लाल रंग
गहिरा असेल कदाचित,
रक्तापेक्षाही"
मग?
"तिथनंच आला चालत
एक लंगडा भिकारी
कष्टानं.
दगडांतून.
त्यानं दिली त्याची काठी मला.
ठेशन धा मिन्टावर हाय, बोलला.
खूप कष्टानं आलो चालत. तोसुद्धा--
खुरडत, सरपटत.
मग ऍम्ब्युलन्स आली. कुणीतरी नेलं
हॉस्पीटलमधे.
या धावपळीत--
ही काठी, त्या भिका-याची.
राहिली रे माझ्याकडे.
कसा चालत असेल?
कसा पोट भरत असेल तो?
येशील माझ्याबरोबर?
शोधू आपण त्याला.
येशील?"
चल.
उठला कष्टानं. 
तीच भिका-याची काठी घेत.
ओबडधोबड.
रीक्षानं जाताना,
ती काठी होती माझ्या हातात.
जाणवलं--
अचानक त्या ठार कोरड्याखट्ट काठीला
पानं फुटत आहेत--
वाढत्येय ती. बहरते आहे.
आभाळापर्यंत.
रीक्षातनं बाहेर 
शून्यात बघणा-या मित्राकडे 
नजर वळाली.
ज्ञानोबाच्या झाडाचं बी
रुजत होतं कुठेतरी त्याच्या काळजात.
त्या वाळक्या काठीसोबत.
ओबडधोबड.


.

शनिवार, १४ मार्च, २००९

माझ्या मातीचे डोहाळे - हरीश दांगट

.

माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश
भर दुपारीस झाला , तिन्ही सांजेचा प्रकाश 

वादळाचा झाला जोर, झेली धरणी प्रहार 
उणे फेडायाच्या साठी, झाडे घेती कैवार
विज कडाडून उजळी , अवघे अवकाश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश

रानवारा झाला धुंद, सुटे केतकीचा गंध
झेंडू पडला आडवा, चुर झाला निशीगंध
सार्‍या लिंबोळ्या गळून , लिंब झालासे निराश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश

विज कडाडे आभाळी, जुने छत अश्रु ढाळी
पिंपळाच्या पारावर, आली तुटून डहाळी
वड हालेना जागचा, पारंब्यांचा बाहूपाश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश

आला मातीला पाघळ, तिचे वाहती ओघळ
नदी वाहते भरुन, ओढा करीतो खळाळ
रुजलेल्या बियान्यास, माती घाली मोहपाश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश


March 11, 2009

.

शुक्रवार, १३ मार्च, २००९

हे सार असच बयो - सोनाली घाटपांडे

.

हे सार असच बयो
माहितेय मला
भांड घासता घासता
हात थबकतो तुझा,
पुन्हा पुन्हा
भांड्यावर घातलेल्या नावापाशी!!

ज्याच्या नावे कुंकू कोरतेस
नित्यनियमानं कपाळावर
त्याच्या शर्टाच बटण शिवता शिवता
पुढचा टाकाचं घालावा वाटत नाही तुला

पण तुझ मन मोठं
तोच टाका दुप्पट शक्तीने घालतेस
जणू तो सातजन्मी
उसवूच नाही

इडापिडा टळो म्हणत
देवापाशी दिवा लावतेस
पावलांचा वेध घेत राहतेस
सुफळ संपूर्ण कहाणीचा

खरा शोध तुला तरी लागलाय बयो??
आणि मला तर आजही स्मरतय
पोत्यात पाय घालून पळायच्या
आपल्या दोघीच्या शर्यतीत
.
.
.
तूच नेहमी जिंकायचीस बयो!!!


.

गुरुवार, १२ मार्च, २००९

पार - अहं ब्रह्मास्मि

.

व्याकुळला जीव,
येण्या तुजपाशी.
जन्म-जन्मांचा तो,
राहिला उपाशी.
 
मागतात प्राण,
तुझा एक थेंब.
तहानल्या जीवा,
नको ठेऊ लांब.
  
तुझ्या वाटेकडे,
लावले हे डोळे.
तोडुन मी आलो,
मायेचे हे जाळे.
  
खेळ खेळण्याचे,
दिन ते सरले.
मोहाचे ते जग,
आता ना उरले.
  
सारे भोगुनिया,
जाणिले असार.
नाव आता माझी,
लाव तुच पार.


.

मंगळवार, १० मार्च, २००९

मुलाखत: विजयकुमार

विजयकुमार यांची मुलाखत सादर करताना मला आनंद होतो आहे.  विजयकुमार यांच्या कविता मी ब~याच दिवसांपासून मराठी कविता या ऑरकूट कम्यूनिटी मधे वाचतो आहे.  आज त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्या मनातली बात जाणून घ्यायला मिळाली.  सुरेश पेठे काकांनी मागच्या मुलाखती वाचून काही सूचना केल्या म्हणून त्यांचे आभार.  सगळ्यांच्या आशिर्वादाने साहित्य पत्रकारीता करायला पण मजा येते आहे.  सुरेश काका मी तुमच्या सूचना पुढच्या मुलाखती पासून अमलात आणायचा प्रयत्न करेन.  चला तर आपण विजयकुमार यांच्या मुलाखती कडे वळूया.

तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?
विजयकुमार म्हणतात "कॉलेज मधे असल्यापासून कविता करत आहे. काही तरी सुचते म्हणून लिहीत असे परंतु त्या व्यवस्थित जपून ठेवाव्या असे वाटले नाही त्यामुळे त्या वेळी लिहिलेल्या काहीच कविता संग्रही आहेत."

तुमच्या कवितांबद्दल काही सांगा
स्वतःच्या कवितांबद्दल बोलताना ते म्हनाले, "माझ्या कविता ह्या मानवी भाव भावनांचे विविध पदर उलगडणार्‍या असतात. मागे सुटलेले गाव, जीवनात होणारे अनाकलनीय बदल, कळानुरुप बदलत जाणारी जीवनशैली ह्या गोष्टी माझ्या कवितेत जास्तीत जास्त डोकावतात. नाकारलेल्यांचे, विस्थापितांचे , वंचितांचे दुःख मला पिळवटुन काढते मग ते सगळे माझ्या कवितेत उतरते. माझ्या कविता ह्या अनुभवावर आधारित जास्त असतात त्यात गरजेचे नाही की ते अनुभव माझेच असायला हवेत. मानवी मनोव्यापाराचे चित्रण मला करायला जास्त आवडते.  त्यातून माणूस म्हणून इतराना आणि स्वत: ला समजून घेण्याचा माझा कायम प्रयत्न राहिला आहे."

तुम्हाला कोणते कवी अधिक आवडतात?
त्यांच्या कविता वाचून त्यांना ग्रेस आवडत असावेत हा माझा ठोकताळा अगदी खरा ठरला.  ते म्हणाले , "मी आधी म्हटल्या प्रमाणे विविध अनुभवांचा माझ्या कवितेवर प्रभाव आहे. मराठीतील सगळे लेखक मी वाचले आहेत. माझ्या कवितेवर कवी ग्रेस ह्यांचा प्रभाव आहे. मी त्यांच्या पासून आत्यंतिक प्रभावित झालो आहे. त्यांची गूढता मला भावते. उत्कृष्ट शब्द वापरुन कवितेला उत्तम दर्जा देण्याची आणि योग्य ती खोली प्राप्त करून देण्याची ताकद ग्रेस ह्यांच्यात आहे . ते सदैव माझे प्रेरणास्थान राहीले आहेत. लेखक म्हणून मला श्री. ना पेन्डसे खूप आवडतात.  विश्राम बेडेकर हे ही तितकेच आवडतात. माझ्या आई कडून मी खूप काही शिकलो तिच्या आणि ती ज्या पध्दतीने जगली त्या जगण्याचा माझ्या कवितेवर प्रभाव आहे ."

तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?
आधी म्हटल्या प्रमाणे कवी ग्रेस हे माझे प्रेरणा स्थान आहेत. ते मला जास्त भावतात. विंदा करंदीकर आणि ना धो महानोर ह्यांच्या रचना मला आवडतात.  गुलजार ह्यांची तरलता आवडते.

तुमच्या बद्दल अधिक माहिती
माझे नाव विजयकुमार कणसे आहे. मी पुनश्च हरि ओम ह्या नावाने कविता लिहितो. मी एक छोटासा व्यावसायिक आहे. माझे बालपण सातार्‍या जवळील एका गावात गेले. पुढे शिक्षणा साठी मुंबई इथे आलो. वडिलांचा व्यवसाय ही मुंबई मधे होता त्यामुळे  मुंबई मधे आलो. शाळा आणि कॉलेज मुंबई मधेच झाले.  मी अर्थशास्त्र आणि इतिहास ह्या विषयात एम. ए केले आहे.

तुम्हाला आवडणारी तुमची एक कविता 
माझ्या सगळ्याच कविता माझ्या आवडत्या आहेत त्यातील एक निवडणे म्हणजे आईला विचारण्यासारखे आहे तुम्हाला कोणते मूल जास्त आवडते. तरीही आपल्या आग्रहाखातर मी इथे एक माझी कविता देत आहे.

आत्मनिवेदन
संमोहित मनाच्या दुखर्‍या
गाभार्‍याला स्पर्श
करून सांगतो
हे आत्मनिवेदन सत्य
आहे !

पहाटे उमलुन
पहिल्या प्रकाश किरणात
कोमेजणार्‍या बकुळफुलांच्या
संचिताच्या शापासारखे
हे जगणं
अन् क्लेश
नवसाचं रूपं
देवीच्या उंबरठ्यावर
ठोकावं असं
पूर्व परंपरेने चालत आलेलं !

संध्याकाळी मी जेव्हा
डोळ्यावाटे रक्त वाहतो
तेव्हाच
तुझे पारसदार
लालभडक होते
पसरलेले लाल
अन्
येणारे कृष्णमय
ह्याच्या संगमाने जे काही
क्षिताजावर उमटते
त्याला शब्द नसतात
त्याच अवस्थेत
मी असतो
ह्यासाठी पाहिजेतर
मी माझ्या पहिल्या
कवितेच्या गर्भपाताची
शपथ घेतो !

शेवारीच्या कापसात
विधवेची रात्र गुंडाळून
विरह आग आग
होऊन
रात्र जाळतो
मग झोप परागंदा
होते
अन्
मी नागव्याने
पिंपळपाराकडे
वळतो
पूर्वजन्मीच्या पापापासून
मुक्त होण्यासाठी
अनंत प्रदक्षिणेच्या शोधात !


23 / 02 / 2009

विजयकुमार यांच्या अधिक कविता त्यांच्या ऑरकूट वरच्या हुंकार वेदनेचे या कम्यूनिटीवर वाचायला मिळतील.