गुरुवार, ११ जून, २००९

मुलाखत: चैताली अहेर

नमस्कार मंडळी

बरेच दिवसांनंतर पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवी मुलाखत घेऊन सादर होतो आहे. चैताली अहेर या कवियत्री यांची खासियत अशी की त्यांना त्यांच्या प्रतिभेचा साक्षात्कार ऑरकूट वर कविता वाचता वाचता झाला. ऑरकूट चे आभार की त्याने चैताली ला लिहिण्यास प्रोत्साहित केले आणि आपल्याला एक प्रतिभासंप्पन्न कवियत्री मिळाली. चला मी त्यांची घेतलेली मुलाखत वाचुया.

तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?
मी कविता ओर्कुट जोइन केल्यापासूनच लिहायला लागले.... जेव्हा काही कविता लिहिल्या तेव्हा मला कळले की अरे हेच तर मी शोधत होते.....म्हणजे साधारण माझी पहिली कविता मी जुलै ०७ मध्ये लिहिली होती...पण त्याअगोदरपासूनच मी कविता जगत होते बहुधा...अभिव्यक्ती नंतर मिळाली शब्दांना..!!
कवी डॉ.राहूल देशपांडे ह्यांना मी माझे गुरू मानते,अरूण नंदन ह्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले...

तुमच्या कवितांबद्दल काही सांगा
माझ्या कविता ह्या अगदी आतून येतात...मी स्वत:साठी लिहिते...स्वत:शी संवाद करते ..मी कवितांमधून बऱ्याचदा हे जग चालवणाऱ्या शक्तीशी बोलत असते; ज्याला मी माझा "आभाळातला मित्र" म्हणते ...म्हणूनच मी गुढ लिहिते असे सगळे म्हणत असावेत.. तरीही मी वेगवेगळे विषयही हाताळते....

तुम्हाला कोणते कवी अधिक आवडतात?
मला इंदिरा संत ,विं.दा. करंदीकर अधिक भावतात,ग्रेस,सुधीर मोघे... त्याचबरोबर इतरही कवींच्या कविता आवडतात,तेव्हा कविता आवडणं हे महत्त्वाचं.. कवी नाही!!..मी गद्यही तेवढ्याच आत्मियतेने वाचते..

तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?
ते मलाही सांगता येणार नाही..कारण मी कविता आधी लिहायला लागले आणी नंतर कविता वाचन सुरु केले..कदाचित हे जरा वेगळॆ वाटेल ऐकताना पण सत्य हेच आहे...

तुमचे नाव, टोपण नाव, जन्म गाव आणि तुमच्या बद्दल जी माहिती देता येईल अशी माहिती द्या
माझे पुर्ण नाव चैताली दर्शन आहेर आहे.माझे जन्मगाव कोपरगाव जि.अहमदनगर[शिर्डीजवळ]आहे..मी शिक्षिका आहे...


तुम्हाला आवडणारी तुमची एक कविता.

अश्रांत कहाण्या....!!!
प्रत्येकवेळी असंच होतं......
नादभरल्या डोळ्यांनी काही सांगायला जावं.....
अन‌ तु शब्दांची किंतानं ओढून बसावं.....
मी उभं रहावं स्तब्ध झाडाप्रमाणं........
अन‌ तु मूळा-मूळांनी माझ्यात पसरावं....
मी फांद्या मागाव्या उसन्या...
तु नुसतं पानात हसावं...
मी श्वासांच्या कंपनतारांवर वाळत घालावं जगणं....
त्याचवेळी तूझं आयुष्याला बोलावणं....

असंच का होतं....सारखं-सारखं....
भिंगारला जीव श्रांत करून मी बसावं.....
अन‌ तु आणावी परत स्वप्नांची लव्हाळं.....
बोलले नाही ओठांनी शहाण्या...
समजून घे ना....
उपशमल्या जीवाच्या....
अश्रांत कहाण्या....!!!


------चैताली.

मंडळी चैताली अहेर यांच्या कविता वाचण्यासाठी तुम्ही त्यांच्या ब्लागवर इथे जाऊ शकता
चैताली अहेर यांचा ऑरकूट प्रोफाईल इथे बघू शकता




1 टिप्पणी:

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.