शुक्रवार, १३ मार्च, २००९

हे सार असच बयो - सोनाली घाटपांडे

.

हे सार असच बयो
माहितेय मला
भांड घासता घासता
हात थबकतो तुझा,
पुन्हा पुन्हा
भांड्यावर घातलेल्या नावापाशी!!

ज्याच्या नावे कुंकू कोरतेस
नित्यनियमानं कपाळावर
त्याच्या शर्टाच बटण शिवता शिवता
पुढचा टाकाचं घालावा वाटत नाही तुला

पण तुझ मन मोठं
तोच टाका दुप्पट शक्तीने घालतेस
जणू तो सातजन्मी
उसवूच नाही

इडापिडा टळो म्हणत
देवापाशी दिवा लावतेस
पावलांचा वेध घेत राहतेस
सुफळ संपूर्ण कहाणीचा

खरा शोध तुला तरी लागलाय बयो??
आणि मला तर आजही स्मरतय
पोत्यात पाय घालून पळायच्या
आपल्या दोघीच्या शर्यतीत
.
.
.
तूच नेहमी जिंकायचीस बयो!!!


.

३ टिप्पण्या:

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.