.
वर्षं झालं
अजुनही आईच्या डोळ्यातलं
पाणी सरलं नाही
बाबांची शून्य नजर स्थिरावली नाही
येणारे जाणारे सुरूच आहेत
त्यात- भाऊ बहिणी आहेत,
नात्यागोत्याचे आहेत,
मित्र मैत्रिणी आहेत
आणि पोलिस अधिकारीही
पण सारेच चेहरे भकास...
पण आज असह्य झालं
आई आली चहाचा कप घेउन
आणि फेकून दिला मी
तिच्या हातातला कप
थरथरत उभी राहिली
कितीतरी दिवसान्नी आज पहिल्यांदाच,
लाखो ज्वालामुखी डोळ्यातून सांडत होते
अन् जिभेचा पट्टा सुरू झाला
- दांडपट्ट्यासारखा,
... नको मला काही
नको तुमचं खाण पिण
काळज्या करण
तुमचे मायेचे हात
आणि तुमचा अश्रुपात,
निघून जा
आणि कृपा करून बंद करा
ते संतत्वाचे शंढबोल...
माझ्यासाठी दु:ख करताहेत म्हणे !!
अरे एकही माईचा लाल नाही तुमच्यात
माझ्या पाठीवर मायेचा
हात फिरवतात म्हणे...
थू:,
एखाद्या हाताने सुरी फिरवली असती ना
त्या नराधमाच्या गळ्यावर
तर न फिरवताही
मायेचे शतसहस्र हात
फिरले असते पाठीवरून...
माझ्या हृदयातल्या लाखो ज्वालामुखींपैकी
एखादी ठिणगी तरी तुमच्या डोळ्यात
दिसली असती तर
दाह किंचित कमी झाला असता, कदाचित...
अरे बलात्कार कोणावर झालाय,
माझ्यावर की तुमच्यावर??
माझ्यावर आपबिती ओढवली
तेव्हाही मी प्रतिकार केला रे,
ओरबाडलं नखांनी
दातांनी चावे घेतले
जे शक्य झालं
ते सारं केलं प्रतिकारासाठी,
माझी शक्ती कमी पडली...
पण तुम्ही??
तुम्ही तर काही न होताच
लुळे पांगळे झालात...
छि:,
लाज वाटते मला तुमची,
आता मलाच निघायला हवं
नराधमाच्या नरडीचा घोट घ्यायला
आणि तुमच्या शंढत्वाची चिता रचायला...
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.