मंगळवार, १० मार्च, २००९

मुलाखत: विजयकुमार

विजयकुमार यांची मुलाखत सादर करताना मला आनंद होतो आहे.  विजयकुमार यांच्या कविता मी ब~याच दिवसांपासून मराठी कविता या ऑरकूट कम्यूनिटी मधे वाचतो आहे.  आज त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्या मनातली बात जाणून घ्यायला मिळाली.  सुरेश पेठे काकांनी मागच्या मुलाखती वाचून काही सूचना केल्या म्हणून त्यांचे आभार.  सगळ्यांच्या आशिर्वादाने साहित्य पत्रकारीता करायला पण मजा येते आहे.  सुरेश काका मी तुमच्या सूचना पुढच्या मुलाखती पासून अमलात आणायचा प्रयत्न करेन.  चला तर आपण विजयकुमार यांच्या मुलाखती कडे वळूया.

तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?
विजयकुमार म्हणतात "कॉलेज मधे असल्यापासून कविता करत आहे. काही तरी सुचते म्हणून लिहीत असे परंतु त्या व्यवस्थित जपून ठेवाव्या असे वाटले नाही त्यामुळे त्या वेळी लिहिलेल्या काहीच कविता संग्रही आहेत."

तुमच्या कवितांबद्दल काही सांगा
स्वतःच्या कवितांबद्दल बोलताना ते म्हनाले, "माझ्या कविता ह्या मानवी भाव भावनांचे विविध पदर उलगडणार्‍या असतात. मागे सुटलेले गाव, जीवनात होणारे अनाकलनीय बदल, कळानुरुप बदलत जाणारी जीवनशैली ह्या गोष्टी माझ्या कवितेत जास्तीत जास्त डोकावतात. नाकारलेल्यांचे, विस्थापितांचे , वंचितांचे दुःख मला पिळवटुन काढते मग ते सगळे माझ्या कवितेत उतरते. माझ्या कविता ह्या अनुभवावर आधारित जास्त असतात त्यात गरजेचे नाही की ते अनुभव माझेच असायला हवेत. मानवी मनोव्यापाराचे चित्रण मला करायला जास्त आवडते.  त्यातून माणूस म्हणून इतराना आणि स्वत: ला समजून घेण्याचा माझा कायम प्रयत्न राहिला आहे."

तुम्हाला कोणते कवी अधिक आवडतात?
त्यांच्या कविता वाचून त्यांना ग्रेस आवडत असावेत हा माझा ठोकताळा अगदी खरा ठरला.  ते म्हणाले , "मी आधी म्हटल्या प्रमाणे विविध अनुभवांचा माझ्या कवितेवर प्रभाव आहे. मराठीतील सगळे लेखक मी वाचले आहेत. माझ्या कवितेवर कवी ग्रेस ह्यांचा प्रभाव आहे. मी त्यांच्या पासून आत्यंतिक प्रभावित झालो आहे. त्यांची गूढता मला भावते. उत्कृष्ट शब्द वापरुन कवितेला उत्तम दर्जा देण्याची आणि योग्य ती खोली प्राप्त करून देण्याची ताकद ग्रेस ह्यांच्यात आहे . ते सदैव माझे प्रेरणास्थान राहीले आहेत. लेखक म्हणून मला श्री. ना पेन्डसे खूप आवडतात.  विश्राम बेडेकर हे ही तितकेच आवडतात. माझ्या आई कडून मी खूप काही शिकलो तिच्या आणि ती ज्या पध्दतीने जगली त्या जगण्याचा माझ्या कवितेवर प्रभाव आहे ."

तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?
आधी म्हटल्या प्रमाणे कवी ग्रेस हे माझे प्रेरणा स्थान आहेत. ते मला जास्त भावतात. विंदा करंदीकर आणि ना धो महानोर ह्यांच्या रचना मला आवडतात.  गुलजार ह्यांची तरलता आवडते.

तुमच्या बद्दल अधिक माहिती
माझे नाव विजयकुमार कणसे आहे. मी पुनश्च हरि ओम ह्या नावाने कविता लिहितो. मी एक छोटासा व्यावसायिक आहे. माझे बालपण सातार्‍या जवळील एका गावात गेले. पुढे शिक्षणा साठी मुंबई इथे आलो. वडिलांचा व्यवसाय ही मुंबई मधे होता त्यामुळे  मुंबई मधे आलो. शाळा आणि कॉलेज मुंबई मधेच झाले.  मी अर्थशास्त्र आणि इतिहास ह्या विषयात एम. ए केले आहे.

तुम्हाला आवडणारी तुमची एक कविता 
माझ्या सगळ्याच कविता माझ्या आवडत्या आहेत त्यातील एक निवडणे म्हणजे आईला विचारण्यासारखे आहे तुम्हाला कोणते मूल जास्त आवडते. तरीही आपल्या आग्रहाखातर मी इथे एक माझी कविता देत आहे.

आत्मनिवेदन
संमोहित मनाच्या दुखर्‍या
गाभार्‍याला स्पर्श
करून सांगतो
हे आत्मनिवेदन सत्य
आहे !

पहाटे उमलुन
पहिल्या प्रकाश किरणात
कोमेजणार्‍या बकुळफुलांच्या
संचिताच्या शापासारखे
हे जगणं
अन् क्लेश
नवसाचं रूपं
देवीच्या उंबरठ्यावर
ठोकावं असं
पूर्व परंपरेने चालत आलेलं !

संध्याकाळी मी जेव्हा
डोळ्यावाटे रक्त वाहतो
तेव्हाच
तुझे पारसदार
लालभडक होते
पसरलेले लाल
अन्
येणारे कृष्णमय
ह्याच्या संगमाने जे काही
क्षिताजावर उमटते
त्याला शब्द नसतात
त्याच अवस्थेत
मी असतो
ह्यासाठी पाहिजेतर
मी माझ्या पहिल्या
कवितेच्या गर्भपाताची
शपथ घेतो !

शेवारीच्या कापसात
विधवेची रात्र गुंडाळून
विरह आग आग
होऊन
रात्र जाळतो
मग झोप परागंदा
होते
अन्
मी नागव्याने
पिंपळपाराकडे
वळतो
पूर्वजन्मीच्या पापापासून
मुक्त होण्यासाठी
अनंत प्रदक्षिणेच्या शोधात !


23 / 02 / 2009

विजयकुमार यांच्या अधिक कविता त्यांच्या ऑरकूट वरच्या हुंकार वेदनेचे या कम्यूनिटीवर वाचायला मिळतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.