
नमस्कार रसिकहो. आवडणा~या कवितांच्या ब्लाग वर मी अनुराग तुमचे स्वागत करतो. आवडणा~या कविता ब्लाग वर असलेल्या अनेक कवितांपैकी एका कवितेची कवियत्री अनुराधा म्हापणकर यांची आस्मादिकांनी मुलाखत घेतली आणि तीच मुलाखत रसिक दरबारात सादर करतोय. कविता करताना या प्रतिभावंतांना नक्की काय अभिप्रेत असतं. हे स्वतःसाठी कविता करतात की लोकांसाठी? असे अनेक प्रश्न मला पडतात. या मुलाखती व्दारे मी माझ्या प्रश्नांची सरबत्ती अनुराधा दिदींना पाठवली. त्यांनी आवडणा~या कविता ब्लाग साठी ही मुलाखत दिली म्हणून मी त्यांचा आभारी आहे.
तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?
कविता कधी पासून करायला लागलात या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, "माझी पहिली कविता आठवत नाही. आठवतंय ते एवढं की शाळेत, कॉलेजात असताना माझ्या निबंधाचं कौतुक व्हायचं. माझी लाडकी आजी मी दहावीत असताना गेली. तिच्यावर खूप कविता केल्या होत्या ज्या वाचताना आजही तिच्या आठवणींनी रडू येतं. पण त्याआधी नक्कीच कधी तरी कदाचित चौथी पाचवीतच कविता केल्याची ठळक आठवण आहे. पण ती संग्रही मात्र नाही. त्यानंतर जे लिहिले ते रूढार्थाने कविता नाही. पण मैत्रीणींच्या / नातेवाईकांच्या वाढदिवशी विकतचे ग्रीटींग्ज घेण्यापेक्षा कविता करत गेले."
तुमच्या कवितांबद्दल काही सांगा?
स्वतःच्या कवितांबद्दल बोलतांना त्या म्हणाल्या की, "माझ्या कविता नियमीत वाचणारे वाचक म्हणतात, माझ्या कविता रोजच्या आयुष्यातल्या प्रसंगांबद्दल बोलतात. सर्वसामान्य माणसाच्या जिवनातले अगदी उठण्याबसण्यातले प्रसंग. म्हणून कदाचित वाचणा~याला त्या जवळच्या वाटत असाव्यात (किंवा convincing, in other words). मला वाटतं मी प्रत्येक कविता करते तेव्हा तो एक अनुभव असतो. मी स्वतः जगलेला किंवा मग त्या व्यक्तिरेखेत शिरून अनुभवलेला. माझी कविता ही बहुधा माझी स्वतःची विचार करण्याची पद्धत असावी. मी माणसांत, माणसांच्या जगण्यात माझ्या कवितेला पहाते. म्हणूनच कदाचित निसर्ग, झाडं, पानं, यापेक्षा माणसांच्या कविता अधिक करते."
तुम्हाला कोणते कवी अधिक आवडतात?
आवडणा~या कविंबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "पर्टिक्युलरली एखादा कवी किंवा कवियत्री आवडते म्हणण्यापेक्षा त्यांच्या काही कविता खास करून आवडतात. किंवा त्याही पलिकडे जाऊन कवितेतल्या काही ओळी मनात खूप घट्ट बसतात. अगदी खास नाव घ्यायचं तर: सुरेश भट, गदिमा.
तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?
कवितेवर असणा~या प्रभावाबद्दल त्या म्हणाल्या की, "आधीच सांगितल्याप्रमाणे माझ्या कविता, म्हणजे मी जगलेले क्षण आहेत. किंवा जवळचे अनुभव आहेत. माझ्या कविता माझ्या जगण्याचा आरसा आहे. म्हणूनच माझ्या कवितांवर प्रभाव असेलच तर तो माझ्या सभोवतालच्या माणसांचा.. आणि सभोवती घडणा~या प्रसंगांचा.
स्वतःबद्दल सांगतांना त्या म्हणाल्या की त्यांचे नाव सौ. अनुराधा सचिन म्हापणकर. त्या पूर्वाश्रमीच्या कु. अनुराधा नार्वेकर. त्यांचे टॊपण नाव अनू आणि त्यांच्याच शब्दात जन्म देऊन मोठ करणारं आणि सर्व काही देणारं गाव म्हणजे मुंबई. स्वतःबद्दल त्या असेही म्हणाल्या की त्यांच एक अगदी साध सोप्प चाकोरीतलं सिक्युअर्ड आयुष्य आहे असे त्यांना वाटते. शिक्षणाच्या वेळी शिक्षण, मग नोकरी, वेळेत विवाहवेदी, वेळेत अपत्यप्राप्ती आणि चाललंय एक छानसं साधं सरळ आयुष्य.
त्यांची आवडती त्यांचीच एक कविता म्हणजे "चर्चगेट - विरार लोकल" . चला मग या मुलाखतीचा समारोप त्यांच्या या कवितेने करूया.
चर्चगेट - विरार लोकल
लोकलच्या गर्दीत एकदा माझा हातच हरवला...
खूप शोधला तेव्हा लांब कुठे पुसटसा दिसला...
वरच्या कडीला दोन हातांबरोबर लोंबकळत होता..
नखांना त्याच्या काल मी लावलेल्या पेंटचा कलर होता...
पण हाय.. तो माझा हातच नव्हता..
हलवून खूप पाहिला तरी हलतच नव्हता..
उतरायची वेळ झाली तरी हात काही मिळेना..
कुठे शोधू.. कशी शोधू.. काही काही कळेना..
शेजारणीला म्हटलं.. हात माझा शोधून दे..
ती म्हणे.. माझा पाय तरी मिळू दे..
तिची बिचारीची मला किव आली..
म्हटल.. काय ही परिस्थिती झाली..
हाताशिवाय मी उतरेन तरी खाली..
पायाशिवाय तर ही अगदी अपंगच झाली..
तेवढ्यात पायावर पडला पाय.. मी म्हटलं
बघ बाई.. तुझाच की काय..?
ती म्हणाली.. खूप जोरात का पडला?
मी म्हटलं.. हो.. ती म्हणे - सापडला.. सापडला..
मीही मग अगदी हट्टालाच पेटले..
सारं बळ एकवटून मग जोरातच हलले..
ती कळवळली - म्हणाली - हाताचं कोपर लागतयं..
मी म्हटल मग - माझ्याच हाताचं वाटतयं..
तीही हसली गालात.. स्टेशनही आलं तेवढ्यात..
आणि हातापायासकट आम्ही दोघीही राहिलो आत.. !!