चार भिंती अन डोक्यावरती आहे छप्पर म्हणायला..
जीव जडु दे आपण लागु त्याला ही घर म्हणायला..
मदत घेतली नाही मित्रा इतक्यासाठीच तुझ्याकडुन
लोक लागले मलाच असते तुझाच चाकर म्हणायला
जेव्हा जातो त्याच्यापाशी ह्ट्टापाशी अडुन बसतो..
त्याला आता नकोच आहे कुणीच ईश्वर म्हणायला...
दु:ख जरी तु देवुनि गेलीस हसतमुख मी राही सदा
निमित्त झाले दुनियेला असते दिली तु ठोकर म्हणायला..
सभ्यपणाच्या वस्त्राआडुन मला दाविता पुच्छच त्यानी..
त्यांना देखील हवेच होते मी ही वाSSनर म्हणायला...
क्षितिजावर मी धावुन गेलो लांघुन गेलो सार्या दिशा.
जिथे मी गेलो तिथे लागले दे दे भाकर म्हणायला..
इथे तिथे मी विखरुन गेलो..मोडुन गेलो डाव शेवटी
तिथे कुणी मज उरले नव्हते आवर सावर म्हणायला..
नको जीवना मला दाखवु मरण्याची तु भीती कधी..
मी ही देखील तयार आहे तुलाच जा मर म्हणायला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.