सोमवार, १७ नोव्हेंबर, २००८

नैवेद्य..

.
.
मोदक एकशे एकवीस.. 
दुर्वां एकवीस जुड्या
पंचपक्वान्नांचा नैवेद्य.. 
पेढे एकवीस पुड्या

एक दुर्वांकुर तुला
मुलामा सोन्याचा चढवलेला
मूषक राज आणला
खास चांदीत घडवलेला

समोर दानपात्र पेटी
नोट हजाराची टाकली
पुस्तकात एक पावती
दहा हजाराची फाडली

असे भक्त तुझे कैक
सोने तोळ्याने ओतले
कोणी हार फुलं तुरे
तुझ्या गळ्यात घातले

मी फाटकी रे त्यात
अशी आले तुझ्या दारी..
हात जोडले मी फक्त
आणि फिरले माघारी

कागदाच्या काही नोटा
मीही होत्या आणलेल्या
’घे पुस्तकं- शिक भरपूर’
म्हणत देऊ मी केलेल्या 

’ती’ गरिबाघरची पोर
रोज शाळेबाहेर दिसते
शिकायची हौस तिला 
साथ पैशाची परी नसते

तुझे रूप ते प्रसन्न
मी त्या डोळ्यात पाहिले 
तुझे आशिर्वाद बाप्पा
तिच्या डोळ्यातूनी वाहिले..
.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.