बुधवार, १९ नोव्हेंबर, २००८

एकलव्य आणि अर्जुन - मंदार चोळकर

आज पुन्हा एक अर्जुन 
उभा आहे एकलव्य होऊन
युधीष्ठीराच्या सत्या सोबत
अश्वथ्थाम्याची जखम घेऊन

कर्णाच्या वचनांचं,
द्रोणांच्या सुचनांचं,
सावट सहन करतो आहे...
चक्रव्युहाच्या रचनांचं,
असहाय्य नजरेत व्यासांच्या,
अभिमन्युचे श्वास पाहून...
आज पुन्हा एक अर्जुन 
उभा आहे एकलव्य होऊन !

वेदना गांधारीच्या, अन् 
ध्रुतराष्ट्राच्या अंधारीच्या
ओझ्याखाली दाबला आहे
शीखंडीच्या उधारीच्या
भिष्मदेही तडफडतो आहे
स्वतःच स्वतःचे रक्त पीऊन...
आज पुन्हा एक अर्जुन 
उभा आहे एकलव्य होऊन !

भीमाच्या यशासाठी
दुर्योधनाची नशा आहे
द्रौपदीचा क्रोधाग्नी
कुरुकुलाची दशा आहे
दीशाहीन जगदीश्वर
उपदेश ना देई जवळ येऊन...
आज पुन्हा एक अर्जुन 
उभा आहे एकलव्य होऊन !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.