अंधाराचे काही गडद अवशेष..
आणखीन गडद होत जातात ..
आणी ..
सोबत काळवंडत जाणारी रात्र,
आणखीन काळोखी होत जाते ..
काही ढग गर्दी करतात ...
आणी उरलेल्या ताऱ्यांसोबत ..
चंद्रालाही गिळुन टाकतात ..
तेव्हां हलक्याने हेलकावे खाणारी हवा ..
जेव्हा खिडकीशी येऊन थांबते ना !!
तेव्हां तुझी आठवण सळसळुन जाणवते ..
ती तेवढ्यावरच नाही थांबत ..
पडदा बाजुला सारुन ..
टेबलावरच्या पेपरवेट खाली ठेवलेल्या ..
कागदांना चाळु लागते ..
मला ईतक्या काळॊखातही जाणवत ते ..
पण मी काहीच बोलत नाही ..
कस कुणास ठाऊक ??
पण अंधारात वाचता येत तिला ..
माझ्या कविता मात्र अर्ध्याच असतात आजकाल ..
अर्धा डाव माडल्या प्रमाणे ...
कितीही कागद एकामागे एक जुळवले तरी ..
एकसंघ अर्थाच काहीच भेटत नाही तिला ..
आणी ती पुन्हा परतु लागते ..
..................
एव्हाना उजाडलेल असत ..
पण मी तिला अडवत नाही ..
उलट पडदा नीट सारुन देतो ..
ती निघुन तर जाते ..
पण, घरभर पसरुन राहतो एक ओळखीचा सुगंध ...
आणी प्रत्येक कागदावर असते ..एक ओळखीची सळ
कुणीतरी ओळखीचच कविता वाचुन गेल्याच जाणवत ..
..................
मी तुझ्या हार घातलेल्या तसवीरीला बघतो ..
त्यावरचे भाव अंशानेही बदलेले नाहीत ..
फक्त त्या हारातली काही फुल सुकत चालली आहेत ..
दिवस कसा उलटतो कुणास ठाऊक ??
काही अर्ध्या कविता अजुन होतात ..
पुन्हा पेपरवेट खाली जाताट ..
मग पुन्हा अंधार आणी पुन्हा तीच कहाणी ..
पण नव्याने ...
तु माझी कविता जगलीस खरंच ..
पण तेव्हांपासुन पुर्ण कविता अजुन झाली नाही ..
संतोष बडगुजर