शनिवार, २८ फेब्रुवारी, २००९

तू चालत रहा - नाम

.

कधी सरळ सरळ
कधी वक्र वक्र
पायावर भंवरी चक्र चक्र
कधी सुम सुसाट
कधी बिन बोभाट
कधि लपत छपत
कधी गजबजाट
तू चालत रहा

घाल खडावा घाल रिबॉक
पदयात्रा किंवा मॉर्निंग वॉक
बन मिरवणूक कर करमणूक
चल धक्क्याने वा आपसूक
तू ठरव ध्येय तू दिशा ठरव
तू जवळ लांबचा मार्ग ठरव
चल नीघ अता का उशीर अता
घे किक स्टार्ट सुट भन्नाट तू
तू चालत रहा 

जग वाट पहातंय सुर्याची तू नम्रपणे सुरुवात तो कर
जो रोल मिळाला उचल गड्या ये स्टेजवरी तू बनठनकर
शिवधनुष्य प्रत्येकाच्या आयुष्याचे असते अलग अलग
तू उचल तुझे बन अग्नीबाण प्रत्यंचा ओढून धडक धड्क
तू स्वतःच बन मग ब्रह्मबाण घे तुझी आण तोडून प्राण 
तू चालत रहा

तू चिल्लर खुर्दा बनू नको चल महायज्ञ आरंभ तू कर
तू विवेकानंद बन किंवा गांधी शिवाजी वा आंबेडकर
जर व्यापारी बन बिल गेटस खेळामध्ये बन तेंडुलकर
जर कवि लेखक बनणार गड्या नोबेलखाली तडजोड न कर
बघ पक्ष्याच्या डोळ्यामध्ये तू लक्ष्य बनव अन नेम धरून
तू चालत रहा

--नाम

.

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९

आकाश - आकाश बिरारी

.


कोणीतरी, आकाशाचे, रंग सारे, शोधत राही
कोणीतरी, आकाशाची, लांबी उंची, मोजत राही

कोणासाठी, आकाश कुठल्या, संध्याकाळी, सुनं सुनं
कोणासाठी, आकाश रोज, नेहेमीचच, जुनं जुनं

कोणासाठी, आकाश मनी, ओठांवरती, जुनी गाणी,
कोणासाठी, आकाश मागे, ठेऊन जात, डोळ्यात पाणी

कोणासाठी, आकाश कधी, आनंदून , बरसलेल
कोणीतरी, आकाशाच्या, तुकड्यासाठी, तरसलेल

कोणीतरी, आकाशात, भरारण्याची, स्वप्न पाही
कोणीतरी, आकाशात, हरवलेल, शोधतं काही

ज्याच त्याच, आकाश असं, ज्याने त्याने, जपलेल
प्रत्येकाच्या, उरात इथे , आकाश एक, लपलेल



16 फेब्रुवारी 2009


.

बुधवार, १८ फेब्रुवारी, २००९

यूज़ अँण्ड थ्रो - अनंग देशपांडे

.


शाळेपेक्षा ट्यूशन मोठी
बोर्डापेक्षा एण्ट्रन्स एग्झाम
पाठ्यपुस्तक कोण वाचतो
ट्वेण्टी क्वश्चन्स करतात काम..
मागे वळून पहात नाही
शाळेबद्दल नसतो ओढा
शिक्षक कोण आठवत नाही
शाळा संपली, विषय सोडा..
पाहू एखादा मॅटिनी शो
सगळं कसं.. यूज़ अँण्ड थ्रो..!

घरात वेळेवर कोणी नसतं
प्रत्येकाचं वेगळे शेड्यूल
पैसा खर्चून सोयी दिल्या
काळजी नसते.. जेवलं का मूल..
मुलं मोठी होतात तेंव्हा
करिअरपुढे कुटुंब गौण
म्हातारपणी त्रास झाला
आपलीच करणी, आपलंच मौन..
आपुलकीला बसला खो
सगळं कसं.. यूज़ अँण्ड थ्रो..!

नवराबायको एकत्र रहायचं
जबाबदारीचं उगाच ओझं
एकत्र राहिलो तरी प्रायव्हसी हवी
तुझं ते तुझं आणि माझं ते माझं..
कमिटमेंट नको, निष्ठा कशाला हवी
मनात आहे तोवर एकत्र राहू
एकत्र असलो तरी जग मोठं आहे
इकडेतिकडे डोकावून पाहू..
लिव्ह-इन रिलेशनचा फायदा जो
सगळं कसं.. यूज़ अँण्ड थ्रो..!


.

तूही ये असाच..कधीतरी...हर्षदा विनया

.

तू पाठवलेला वारा,
काल कानात गुंजी घालून,
मानेखाली गूदगूल्या करून,
अलगद निघून गेला..
निरोप न घेता...
ए, एकदा तूही ये असाच..

बघ ना ! तो वरचा ढग,
कसं आभाळ व्यापून राहीलाय..
जसं..तू व्यापलंस माझं आभाळ..
एकटाच आला आणि..
गूपचूप बरसून गेला माझ्या अंगणात..
ए, एकदा तूही ये असाच...कधीतरी..

कधीतरी माझ्या खिडकीजवळचा पडदा..
वा-याने फ़ार उडत असतो..
जवळ असले मी की, 
मुद्दाम फ़िरतो माझ्या ओठांवर..
ए..तूही फ़िरून बघ ..
एकदा असाच..कधीतरी....

खळाळती नदी बन कधीतरी..
वाहून बघ..
आत बाहेर माझ्यातून...
भिजव मला.. आणि 
चिंब हो तूही...
बघ.. ये एकदा असाच....
निरोप न देता..
आगंतूकासारखा....

पण ये.. ये ..कधीतरी..